सरकारी जमिनीवर अतिक्रमणप्रश्नी जवखेडयाचे लोकनियुक्त सरपंच अपात्र – जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ पाटील यांना सरपंच सदस्य पदावर राहण्यास अपात्र असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ग्रामपंचायत विवाद अर्ज सुनावणीअंती दिला.

आज बुधवार, दि.16 मार्च रोजी हा जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय दिला. एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम येथील लोकनियुक्त ग्रामपंचायत सरपंच दिनेश जगन्नाथ पाटील यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्याने सरपंच सदस्य पदावरून अपात्र करण्यात यावे, अशी तक्रार प्रवीण दत्तू पाटील यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ जे-३, नुसार विभाग अर्ज क्र. ४५/२०२१ नुसार जिल्हाधिकारी कार्यालयात  दाखल केली होती. यावर चौकशी होऊन सरपंच दिनेश पाटील यांनी शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अनधिकृत पणे भोगवटा देखील लावून घेतला आहे. ही मिळकत ताब्यात ठेवून सरपंचपदाचा दुरुपयोग केला असल्याचे सुनावणीअंती सिद्ध झाले. त्यानुसार जवखेडे सिम, ता.एरंडोल येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

शासकीय जमिनीवर मी अतिक्रमण केले नसून माझी आत्या वजाबाई देवराम पाटील यांना शासनाने घरकुल दिलेले होते. त्यास वारस नसल्यामुळे सदरील जागा मिळकत दिनेश पाटील यांच्या नावे करून दिली असल्याचा बचाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फेटाळून लावत सरपंच व सदस्य पदावर राहण्यास अपात्र असल्याचा निर्णय दिला. तक्रारदार प्रवीण दत्तू पाटील यांच्या तर्फे ॲड.विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले.

Protected Content