मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे फोन टॅपींगचे प्रकरण चव्हाट्यावर आले असतांना या प्रकरणी आता पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून यात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे फोन टॅप करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या फोन टॅपींग प्रकरणी अडचणीत आल्या असून त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र आता त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याच्या आरोपाखाली कुलाबा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणातील त्यांच्यावरील हा तिसरा गुन्हा आहे.
सध्या केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये (सीआरपीएफ) प्रतिनियुक्तीवर असलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असताना त्यांनी कोणत्याही परवानगीविना विविध पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ’फोन टॅपिंग’ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचा अहवाल सरकारला सुपूर्द करण्यात आला. सरकारने अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुण्याच्या बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा आरोप या गुन्ह्यात करण्यात आला होता. अशाच प्रकारे गुन्ह्याच्या तपासाचे कारण पुढे करून, टोपण नावे वापरून संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचेही फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर आहे. एकनाथराव खडसे यांचा फोन टॅप करण्यात आला तेव्हा ते भाजपमध्ये होते. यामुळे एकीकडे विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करतांना भाजपमधीलच नाथाभाऊ आणि तेव्हा मित्रपक्ष असणार्या शिवसेनेतील संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप हा राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारा ठरला आहे.
दरम्यान, मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला या़च्या विरोधात नव्याने नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात शुक्ला यांनी पदाचा गैरवापर करून १ नोव्हेंबर २०१९ मध्ये खासदार संजय राऊत यांचे फोन टॉप केल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे या़ंचाही ते भाजपात असताना म्हणजेच ऑगस्ट २०१९ दरम्यान फोन टॅप केल्याचं समोर आलं आहे. विधीमंडळ समितीच्या चौकशीत हा प्रकार समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे. या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. या कमिटीने २०१५ ते २०१९ दरम्यान फोन टॅपिंगची चौकशी केली.