जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाने गावाजळून गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी गुरूवार ३ मार्च रोजी ट्रॅक्टर चालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आव्हाने गावाजवळ असलेल्या गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार गुरूवार ३ मार्च रोजी तालुका पोलीस कर्मचारी यांनी दुपारी ४ वाजता गिरणानदी पात्राजवळील आव्हाणे गावाजवळ अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतुकीचा परवाना विचारले असता ट्रॅक्टर चालक सुनील बाबुराव सोनवणे (वय-४२, रा. आसोदा रोड जळगाव) याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तालुका पोलिसांनी वाळूने भरले ट्रॅक्टर (एमएच १९ एपी ६१७५) हे जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल भूषण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ट्रॅक्टर चालक सुनील सोनवणे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल अशोक मोरे करीत आहे.