बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केलेले नाही – तेंडुलकर

 

images 13

मुंबई (वृत्तसंस्था) ‘माझ्याकडून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही, तसेच मी मुंबई इंडियन्स आयपीएल संघाकडून कोणताही मोबदला घेत नाही’, असे स्पष्टीकरण देतानाच सचिन तेंडुलकर याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी पाठवलेल्या नोटीशीला दिलेल्या उत्तरात तेंडुलकरने सगळ्या आरोपांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

 

आपण मुंबई इंडियन्स या आयपीएल संघाचे मार्गदर्शक असून माझ्या अनुभवाच्या आधारे मुंबई इंडियन्स संघाला योग्य ते मार्गदर्शन करणे हे माझे काम आहे. हा मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचा भाग आहे. बीसीसीआयच्या नियम ३८ (४) (जे) यात उल्लेख केल्याप्रमाणे कोणतेही पद मी भूषवित नाही, असे स्पष्टीकरण तेंडुलकर याने दिले आहे.

या योगदानाचा कोणताही मोबदला आपण संघाकडून घेत नाही. आपण कोणतेही अधिकृत कार्यालयीन पद स्वीकारलेले नाही. मार्गदर्शक म्हणून काम करत असताना संघाबाबत कोणताही निर्णय घेण्याची जबाबदारीरी आपल्यावर नसल्याने हितसंबंधांचा कोणताही मुद्दा उपस्थित होत नसल्याचे तेंडुलकरने म्हटले आहे.
तेंडुलकर आणि प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी हितसंबंधांच्या मुद्द्यावरून नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतर बीसीसीआयचे अनेक अधिकारी नाराज झाले होते. सचिन आणि लक्ष्मण यांना नोटीस पाठवायला नको होती, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.

Add Comment

Protected Content