पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । म.रा.वि.वि. कंपनीकडून पुरेसा वीज पुरवठा होत नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते, यासाठी त्वरित आवश्यक ती उपाययोजना करावी, अश्या मागणीचे निवेदन आमदार चिमणराव पाटील यांच्यातर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, म.रा.वि.वि. कंपनीकडून शेतकऱ्यांना पूर्वी दहा तास विज उपलब्ध करून दिली जात होती. त्यांनतर ती आठ तास व आज रोजी फक्त ६ तास विज देण्यात येत आहे व ती सुद्धा पुरेश्या दाबाने व नियमीत मिळत नाही. (अतिवृष्टी, (दुष्काळ) पावसाचा बदलत्या हवामानाचा प्रभाव यासारख्या अस्मानी व सुलतानी संकटामुळे यापूर्वीच शेतकरी हैराण झालेला असतांना आता शेतकऱ्यांना मुबलक पाणी असूनही पुरेश्या दाबाने पुरेश्या वेळेत नियमीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बी हंगाम तोंडाशी असतांना तोही हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.) अश्या भयावह परिस्थितीमुळे शेतकरी संतप्त होवून सामुहीक आत्महत्येच्या मनस्थितीत जगत आहेत.
शेतात पिक, विहिरीत पाणी असूनही विज पुरवठ्याअभावी हातची पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यास्तव म.रा.वि.वि. कंपनीच्या कारभारात सुधारणा न झाल्यास नाईलाजाने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागतील. म्हणून पुरेश्या दाबाने, पुरेश्या वेळेसाठी वीज पुरवठा सुरळीत करणेकामी आवश्यक ती कार्यवाही अत्यंत जलद व युध्दपातळीवर केली नाही तर राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यासाठी त्वरित आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी व त्याबाबत संबंधितांना योग्य ते आदेश व्हावेत अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य अभियंता शेख यांचेकडे पत्रान्वये केलेली आहे.