जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव येथे राहत्या घरात आईच्या डोक्यात कुऱ्हाड मारून खून करणाऱ्या मुलाला जळगाव जिल्हा न्यायालयाने नऊ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा आणि १० हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे.
मंगळवारी, २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला असून याची सविस्तर माहिती अशी की, “शहरातील डेअरी भागातील शिंगाटे मळा व नालंदा विद्यालयाच्या शेजारी राहणारे घरमालक पंडीत हिलाल शिंगटे यांच्या घरात पमाबाई वाल्मिक शेवाळे (वय-50) ह्या आपल्या पती व मुलगासह भाड्याने राहत होते. दि. ६ जून २०१९ रोजी पमाबाई यांचे पती वाल्मिक शेवाळे हे मुलीच्या मुलांना (नातेवंडे) येवला जि.नाशिक येथे पोहचविण्यासाठी गेले होते. सकाळपासून घराचा दरवाजा उघडाच होता.
दुपारी २ वाजेच्या सुमारास घरमालक पंडीत शिंगटे यांची पत्नी स्वयंपाकासाठी कढीपत्ता घेण्यासाठी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घराचा पडदा ढकलून पाहिले असता त्यांना पमाबाई शेवाळे रक्तबंबाळ अवस्थेत मृत झालेल्या आढळल्या होत्या. हा खून त्याचा मुलगा समाधान वाल्मिक शेवाळे याने कुऱ्हाडीने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्याने हा खून दारूच्या नशेत केला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगाव जिल्हा न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते. या खटल्याने सरकारपक्षातर्फे एकुण १९ साक्षीदार तपासण्यात आले होते. यात आरोपीचे बहिणी आणि मेहुणे हे फितूर झाले हाते. पोलीसांकडे आरोपी समाधान याने गुन्ह्याची दिलेली कबुली आणि रक्ताने माखलेले कपडे याच्या अहवालानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.जी.ठुबे यांनी समाधान वाल्मिक शेवाळे याला दोषी ठरवत मंगळवार, दि. २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ९ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा आणि १० हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक शासकीय अभियोक्ता सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.