पारोळा प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा तालुका समन्वय समिती, पारोळा तालुकास्तरीय व नगरपालिकास्तरीय दक्षता समिती व संजय गांधी निराधार समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली.
यासमयी समन्वय समितीच्या बैठकीत आमदार चिमणरावजी पाटील यांनी नगरपरिषदेच्या प्रस्तावित असलेल्या ४२.४८ कोटी रूपयाचा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेसंदर्भात पारोळा शहर पाणीपुरवठा योजना तातडीने त्रुटींची पुर्तता करून सुधारीत प्रस्ताव त्वरीत शासनाकडे सादर करावा, अशा सुचना मुख्याधिकारी यांना केल्या. सदर प्रस्ताव तातडीने दाखल झाल्यास त्याचा योग्य तो पाठपुरावा करून एका आठवड्यात योजना मंजुर करून आणु असे उपस्थित अधिकाऱ्यांना आबा यांनी सुचित केले.
यासह या बैठकीत विविध विभागांचा आढावा घेऊन पारोळा तालुक्यातील प्रलंबित विषयांबाबत प्राधान्याने लक्ष घालुन योजना मार्गी लावण्याचा सुचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच पारोळा तालुका संजय गांधी निराधार समिती योजनेंतर्गत २४८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली व कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत पारोळा तालुक्यातील ८ लाभार्थ्यांना धनादेश आणि अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १०६ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तहसिलदार अनिल गवांदे, मुख्याधिकारी ज्योती भगत, गटविकासअधिकारी विजय लोंढे, पोलीस निरिक्षक संतोष भंडारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत सुर्यवंशी, डॉ.योगेश साळुंखे यांसह विविध विभागांचे अधिकारी, तीनही समित्यांचे सर्व सदस्य, पत्रकार, रेशन दुकानदार उपस्थित होते.