जळगाव, प्रतिनिधी | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मराठीतील पहिल्या आधुनिक कवयित्री असून त्यांनी स्त्रीवादी कार्याचा प्रारंभ केला. असे प्रतिपादन विचारवंत प्रा. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेतील महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र व डॉ. आंबेडकर विचार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान झाले. या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अनिल डोंगरे होते. प्रा. लुलेकर म्हणाले की, सावित्रीबाई या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. त्यांनी स्त्रियांच्या सर्वांगिण उत्थानाचे कार्य केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. डोंगरे यांनी सद्याच्या शिक्षण व्यवस्थेत सावित्रीबाईंच्या शैक्षणिक विचारांची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुबोध वाकोडे यांनी केले हर्षल पाटील यांनी आभार मानले. विभागप्रमुख डॉ. पवित्रा पाटील यांनी प्रास्ताविक केले.