अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा येथील निवडणुक नायब तहसिलदार पंकज पाटील व वरीष्ठ कारकुन सुदाम भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली साळुंखे, सानप व श्रीमती पाटील यांनी वेळोवेळी याबाबत जागृती केली. याचाच एक भाग म्हणुन आज वयाची ८४ वर्ष पुर्ण केलेल्या मात्र लिहिता-वाचता येत नाही व तब्बेत स्थुल आहे, अशा कारणांमुळे आजपर्यंत एकदाही मतदान न केलेल्या श्रीमती सखुबाई विजय भिल यांनी यावेळी वयाच्या ८४ व्या वर्षी प्रथमच मतदान केले.
त्यांची भिती व गैरसमज शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रस्तरीय मतदान अधिकारी साळुंखे यांनी दूर केले. त्यानंतर आज त्यांनी न भिता मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्या म्हणाल्या हे तर सोपे असते. मरणाच्या अगोदर मी मतदान केले याचा मला आनंद झाला आहे. यावेळी श्रीमती भिल यांचा मतदान क्षेत्रिय अधिकारी हेडावे -हिरापूर सेक्टर १५ जे डी पठाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी धाबे केंद्रस्तरीय मतदान अधिकारी मनवंतराव साळुंखे, हिरापूर धाबे तलाठी के. टी. सानप, पोलिस कॉन्सटेबल एस्. एस्. कापसे (लाड वंजारी) चंद्रपूर, शेळावे ग्रामसेविका श्रीमती योगिता पाटील, व्हीडीओ फोटोग्राफर प्रविण आर. पाटील अमळनेर, मतदान केंद्र पाळणाघर संचालिका सौ. सुलोचना साळुंखे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष युवराज भिल, वीर एकलव्य बजरंग ग्रुप अध्यक्ष रविंद्र भिल उपस्थित होते. या निवडणुकीतही ८२ टक्के मतदानाचा या केंद्राने उच्चांक केला आहे. मुख्याध्यापक साळुंखे यांना मतदानाच्या वर्षभर चालणाऱ्या प्रक्रियेत सतत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल निवडणुक आयोगाने पुरस्कार दिला आहे.