जम्मू वृत्तसंस्था | असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या वैष्णोदेवी मंदिरात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली असतांना रात्री उशीरा झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वैष्णोदेवी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यानुसार यंदा कोरोनाचा प्रकोप असतांनाही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. रात्री सुमारे दोन वाजता काही भाविकांमध्ये वाद झाला. याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामुळे हजारो भाविकांची पळापळ सुरू झाली. यात १२ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.
दरम्यान, चेंगराचेंगरीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले. तर आता मंदिर परिसरातून भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.