जळगाव प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाची वर्क ऑर्डर अखेर मिळाली असून यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. अर्थात, यामुळे लोहारा ग्रामस्थांच्या लढ्याला यश लाभले आहे.
याबाबत वृत्त असे की, लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. वर्षभरापूर्वीच याचे एका कंत्राटदाराला काम देखील मिळाले होते. या कामाला प्रारंभ होत नसल्याने ग्रामपंचायत कार्यकारिणीसह ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते.
या आंदोलकांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट घेऊन या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी मंत्रालयातून ही समस्या सोडविली. त्यांनी ग्रामविकास मंत्रालयातून विशेष बाब म्हणून लोहारा प्रकरणात कार्यरंभ आदेश देण्याचे अधिकार सीईओंना देऊन हा विषय मार्गी लावला आहे. निविदा मंजुरीमध्ये होणार्या राजकारणावर पर्याय म्हणून निविदा स्वीकृतीचे अधिकार सीईओंना प्रदान करावे अशी विनंती करणारे पत्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामविकास विभागाला दिले आहे. यावर विशेष बाब म्हणून लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निविदा स्वीकृतीचे अधिकार सीईओंना दिल्याचे पत्र ग्रामविकास विभागातर्फे काढण्यात आले आहे. यामुळे हा प्रश्न सुटला आहे.