नवी दिल्ली वृत्तसंस्था | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पाठोपाठ राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद हे देखील कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा राजकीय पक्ष काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
कॉंग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करणार्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद यांचा देखील समावेश होता. थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान दिल्याने हा जी-२३ नावाचा नेत्यांचा गृप चर्चेत आला होता. अद्यापही पक्षाने यातील नेत्यांवर कारवाई केलेली नाही. मात्र यातच आता गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मिरमध्ये वेगळी चूल मांडून नवीन पक्ष काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात आझाद यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी राजकारणात काहीही होऊ शकते असे सांगून सस्पेन्स वाढविला आहे.
कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब आदी राज्यांमध्ये यामुळे खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये तर पक्षात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमिवर, आझाद यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याने वेगळी वाट धरल्यास पक्षाला तो नवा हादरा ठरणार आहे.