पारोळा प्रतिनिधी | संविधान दिन असूनही नगरपालिकेने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची साफसफाई केली नाही. यासंदर्भात दलित सेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र जावरे यांनी तहसिलदार श्री.गवांदे, पोलिस निरीक्षक श्री.भंडारे तसेच पारोळा नगरपालिका नगराध्यक्ष यांना निवेदन तसेच तक्रार दिली.
सविस्तर वृत्त असे की, भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन त्यांनी लिहिलेल्या संविधानाचे पूजन केले जाते. परंतू पारोळा नगरपालिका हद्दीतील हायवे नं 6 लगत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची साफसफाई व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्वच्छ धुवून साफसफाई केली जाते मात्र सदर परिसर धुळखाणीत अवस्थेत आढळून आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमीनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यास्तव पारोळा नगरपालिका अधिकारी यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. संबंधित अधिकारीवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी आज लोकजनशक्ती पार्टीचे तथा दलित सेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र जावरे यांनी निवेदनाद्वारे केली याप्रसंगी राकेश जावरे जिल्हाध्यक्ष लोकजनशक्ती पार्टी, शाम जाधव जिल्हाध्यक्ष लोक जनशक्ती पार्टी बंजारा प्रकोष्ट, अशोक कापडणे, रवि निकम, सुखा निकम, अरविंद जाधव, देवमन कुवर, राजुभाऊ पटाईत, भैय्या मोरे व सिकंदर सोनवणे आदी उपस्थित होते.