जळगाव प्रतिनिधी । बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या वृध्देच्या रोकडसह दागिन्यांची पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव – शहरात खरेदी करत असतांना या वृध्देची रोकडसह दागिने असा एकूण १ लाख १० हजारांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी गांधी मार्केटसमोर घडली. याप्रकरणी दुसर्या दिवशी आज मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील रहिवासी नातीचे लग्न असल्याने जिजाबाई वासुदेव कोळी वय ६० रा. कृष्णा कॉलनी अडावद ता. चोपडा ह्या जळगावात आल्या होत्या. जिजाबाई कोळी यांना खरेदी करावयाची असल्याने त्यांना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांची नातीने दुचाकीवरुन शहरात गांधी मार्केटजवळ सोडले. त्यानंतर गांधी मार्केटमधील एका दुकानात जिजाबाई ह्या साड्या घेण्यासाठी गेल्या असत्या त्यांना त्याठिकाणी त्यांचे भास वाहरी, अनिता सुर्यवंशी व सोनाली सुर्यवंशी ह्या दोघी जणी भेटल्या. त्यांच्यासोबत जिजाबाई यांनी साड्या घेतल्या. याचवेळी गांधी मार्केट समोरुन रथ जात असल्याने त्यांच्या दर्शनासाठी जिजाबाई या गांधी मार्केटसमोर रस्त्यावर आल्या. रथाचे दर्शन घेतल्यावर जिजाबाई यांच्यासोबतच्या त्यांच्या नातेवाईक महिला निघून गेल्या. त्यानंतर जिजाबाई ह्या केळी घेण्यासाठी याच परिसरात एका विके्रत्याकडे गेल्या. केळी विक्रेत्याला पैसे देण्यासाठी जिजाबाई यांनी बॅगमध्ये हात घातला असता, पैसे असलेली छोटी पर्स दिसली नाही. या पर्समध्ये ७५ हजारांचे २६ ग्रॅमचा सोन्याचा तुकडा, १५ हजार रुपयांचा ६ ग्रॅमचा सोन्याचा तुकडा व २० हजार रुपये रोख असा १ लाख १० हजारांचा ऐवज होता. परिसरात सर्व शोध घेतला मात्र पर्स मिळून आली नाही. अखेर जिजाबाई कोळी यांनी मंगळवारी सायंकाळी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहेत