एसटी कर्मचारी ठाम : संपावर तोडगा नाहीच

मुंबई प्रतिनिधी | एसटी कर्मचार्‍यांच्या संपात फूट पडल्याच्या बातम्या समोर आल्या असल्या तरी आज रविवारी संप अजूनही सुरूच असल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने पूर्ण मागण्या मान्य केल्याशिवाय ड्युटीवर जाण्यास कर्मचार्‍यांनी नकार दिल्यामुळे संप लवकर संपुष्टात येण्याची शक्यता धुसर बनली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, आज देखील एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे बसेसचा चक्काजाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.  अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरू आहे. त्यात एसटी कर्मचार्‍यांवर शासनानं निलंबनाची कारवाई केल्यानं संपकरी आणखी संतापलेत. त्यात काल परिवहनमंत्र्यांनी संप मागे घ्या, निलंबन मागे घेऊ असा शब्द दिलाय. तरी, संप अजूनही मागे घेतलेला नाही. त्यात आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परबांशी चर्चा होणार आहे. यानंतर आंदोलक नेते पुढची भूमिका ठरवणार आहेत.

 

दरम्यान, वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. विविध डेपोतून शिवशाही बस मार्गस्थ झाल्यात. या बसेसना पोलीस संरक्षणही देण्यात आलं. तसंच खासगी बसचालकांची मदत घेऊनही एसटी सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचार्‍यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही परिवहन मंत्र्यांनी दिले आहे. यामुळे आता पुन्हा चर्चेच्या फेरीतून काही तरी तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content