जळगाव प्रतिनिधी | वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांचे सुरू असलेले आंदोलन अजून तीव्र झाले असतांना आता एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेत राज्यातील ३७६ कर्मचार्यांचे निलंबन केले असून यात जळगाव जिल्ह्यातील चौघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील एसटी कर्मचार्यांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता तीव्र स्वरुप धारण केलंय. तर दुसरीकडे आता राज्य सरकारनेदेखील कडक पवित्रा धारण केलाय. एसटी महामंडळाने एकूण ४५ आगारांमधील तब्बल ३७६ कर्मचार्यांचे निलंबन केलं आहे. यात जळगाव जिल्ह्यातील चार कर्मचार्यांचा समावेश असून हे अमळनेर आगारातील कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असतांनाही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही संपकर्यांची मुख्य मागणी आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत संप मागे घेतला जणार नाही, असा पवित्रा कर्मचार्यांनी घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने निलंबनाचे हत्यार उपसले आहे.
तर दुसरीकडे एसटी कर्मचारी संपात सहभागी असणार्या कर्मचार्यांच्या विरोधात राज्य सरकारने अवमान याचिका दाखल केली आहे. २५० डेपो मधील अडीच हजार आंदोलक कर्मचार्यांवर कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.