जळगाव, प्रतिनिधी | आकाशवाणी चौकातील तापी पाटबंधारे महामंडळ विश्राम गृहाचे कुंपण भिंतीचे अतिक्रमण महामंडळाने स्वतः काढून घ्यावे अन्यथा सात दिवसात महापालिकेतर्फे ते काढण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी पत्राद्वारे अधीक्षक अभियंता दिला आहे.
आकाशवाणी चौकातील तापी पाटबंधारे महामंडळ विश्राम गृहाचे कुंपण भिंतीचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली होती. यानंतर मनपाने मोजमाप करून तापी महामंडळाला अतिक्रमित भिंत काढण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र तापी महामंडळाने कुठलीच कारवाई न केल्याने मनपा आयुक्तांनी सात दिवसात अतिक्रमित भिंत काढण्याचे पत्र अधीक्षक अभियंता यांना दिले आहे.
पत्राचा आशय असा की, तापी पाटबंधारे महामंडळाच्या अतिक्रमीत भिंतीचे बांधकाम आपले विभागामार्फत त्वरीत काढुन सहीस रोडची जागा मोकळी करुन द्यावी या बाबत आपणास कळविण्यात आलेले होते. मात्र अद्यापही आपले विभागामार्फत या बाबत कार्यवाही करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व नुतनीकरणाचे कार्य सार्व.बांधकाम विभागामार्फत प्रगती पथावर आहे त्या करीता महामार्गाचे सर्व्हिस रोडचे काम करुन घेणे सुलभ होण्यासाठी सदर कुंपण भिंतीचे काम काढणे आवश्यक आहे. तसेच या बाबत श्री.दिपककुमार गुप्ता यांनी संदर्भ क्र.०३ नुसार पुनश्च पत्र दिलेले आहे. तरी उपरोक्त कार्यवाहीने सार्वजनिक हित साध्य होणार असल्याने कृपया, सदर कुंपण भिंतीचे बांधकाम ७ दिवसाचे आत आपले विभागामार्फत काढावे. अन्यथा महानगरपालिके मार्फत सदर अतिक्रमण काढण्यात येईल.