बुलडाणा प्रतिनिधी । आदिशक्तीचा जागर म्हणजे नवरात्रौत्सव उद्यापासून सुरू होत आहे. कोरोनाकाळात सूचनेनुसार, सार्वजनिक दुर्गा मंडळांनी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा यापेक्षाही कमी प्रतिष्ठापना होणार असल्याचा कयास आहे.उद्या घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिकस्थळे उघडणार आहेत. यावर्षी देखील कोरोना नियमांच्या चौकटीत हा उत्सव साजरा करण्याच्या आवाहनासह नवरात्रोत्सव आरोग्यदायी उपक्रमांतर्गत आरोग्य उत्सव ठरावा, अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी व्यक्त केली
याबाबतचा वृत्तान्त असा की, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणेकरांना भव्यदिव्यतेचा कुठलाही तामझाम न करता, डोळ्यांना दिपवणारी रोषणाई नसणारा दुर्गोत्सव अनुभवता येणार आहे.कोरोनामुळे सण-उत्सवांच्या आनंदावर विरजण आले असले तरी, उत्साह, भक्ती, श्रद्धा कमी झालेली नाही. मात्र काहीशी सार्वजनिक स्वरूपात आनंद व्यक्त करण्याची मजा हिरावली आहे. दरवर्षी असणारा लखलखाट, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यंदा नसेल. डीवायएसपी सचिन कदम यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे म्हणाले की,’रस्त्याच्या दुतर्फा असणारी विद्युत दिव्यांची आरास, मोठा मंडप, डेकोरेशन रद्द करण्यात आले आहे. लहान आकाराची मूर्ती आणि घट स्थापन करण्यात येणार आहे. यंदाचा उत्सव हा पूर्णत: मंडळांच्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित आहे. भाविकांनी गर्दी करू नये,असे आवाहन करण्यात येत आहे. उत्सवादरम्यान रक्तदान शिबिर, प्लाझ्मा देऊ शकणाऱ्यांची यादी तयार करण्याचा उपक्रम राबवावा. बँडबाजा, ढोल-ताशाशिवाय देवीचे आगमन आणि विसर्जन करावे. भाविकांना देवीजवळ जाता येणार नाही. नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल तसेच भाविकांनी सुरक्षित वावर जोपासत दर्शन घ्यावे,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.या बैठकीत ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सदानंद कांबळे,राजेश्वर रेड्डी, श्रीकृष्ण राऊत, सिद्धार्थ जाधव,सौ. वंदना जिने, अरुण जगताप, गजानन चांदवडकार, गजेंद्र दांदडे यांच्यासह पोलीस पाटील व शहरातील दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आगमन किंवा विसर्जनावेळी मिरवणूक नाहीं.शिवाय गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक शिबीरं आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्याविषयीचे प्रतिबंधात्मक उपाय यासंबंधीची जनजागृती करण्यात यावी.
▪️ काय आहे नियमावली?
*सार्वजनिक नवरात्र उत्सवासाठी मंडळांनी, नगरपालिका प्रशासन वा स्थानिक प्रशासन यांची पूर्वसंमती घेणे आवश्यकआहे
*घरगुती मूर्तीची कमाल मर्यादा 2 फूट आणि सार्वजनिक उत्सवातील मूर्तीची कमाल मर्यादा 4 फूट इतकी ठेवण्यात आली आहे.
*गेल्यावर्षीप्रमाणे शक्यतो धातूच्या मूर्तीचे किंवा घरातील संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे, ते शक्य नसल्यास देवीची शाडू मातीची
पर्यावरणपूरक मूर्ती स्थापन करावी
*नवरात्र उत्सवासाठी वर्गणी, स्वेच्छेने देणगी दिल्यास तिचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही किंवा लोक त्याकडे आकर्षित होणार नाही याची दक्षता घ्यावी. या जाहिरातींवर आरोग्य विषयक संदेश तसंच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेविषयी जनजागृतीही करण्यात यावी.