मुंबई (वृत्तसंस्था) नांदेडनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोलापूर येथे जाहीर सभा झाली. या सभेतही राज ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणे भाजपा आणि मोदीविरुद्ध प्रचार केला. मात्र, ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरेंचा मुक्काम होता, त्याच हॉटेलमध्ये शरद पवार हेही थांबल्याचे समोर आल्यानंतर ठाकरे आणि पवार यांच्याबाबत एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, भाजपाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरे आणि शरद पवार एकच असून कर्ता आणि करविता एकत्र आले, अशी टीका केली आहे.
सोलापूर दौऱ्यावेळी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्याच हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही त्याच दिवशी उतरले होते. एवढेच नव्हे तर, दरम्यान, याच हॉटेलमध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही होते, अशीही माहिती आहे. तर राज ठाकरेंचा सोलापूर तर शरद पवार यांचा उस्मानाबाद दौरा एकाच दिवशी होता. राज आणि पवार यांच्या एकाच हॉटेलमध्ये थांबल्याची बातमी येताच, भाजपाने राज ठाकरेंवर टीका केली आहे.