शिक्षण आणि सामाजिक कार्यात अग्रेसर-डॉ एस आर पाटील

d89f711b e3e5 4d1e 93c7 1732bd321963

 

पांढरे शुभ्र केस, साधी राहणी,स्पष्ट उच्चार आणि खळाळते निर्व्याज हास्य! डॉ एस आर पाटील यांची ही काही प्रथमदर्शनी दिसणारी गुणवैशिष्ट्ये ! पण थोडा अधिक काळ तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात तर तुम्हाला जाणवेल- त्यांचे सतत कार्यरत राहणे, निष्कलंक चारित्र्य,निर्व्यसनी आणि समाजसेवी व्यक्तिमत्व आणि आणखी बरीच काही चांगली गुणवैशिष्ट्ये ! शिक्षण, समाजसेवा आणि आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांचे चिरंजीव डॉ संदीप,सुनबाई सौ. योगिता हे दोघे प्रथितयश सर्जन असतानाही ते वयाच्या 72 व्या वर्षीही त्यांच्या घरी दवाखान्यात बसून रुग्णसेवा करताना दिसतील. हा त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा एक पुरावा म्हणता येईल.

 

रावेर जवळचे पुनखेडा हे त्यांचे मूळ गाव आणि जन्मगाव देखील.1969 मध्ये बीएएमएस ही पदवी मिळवून त्यांनी आपली प्रॅक्टीस लगेच सुरू केली.मात्र ती करत असताना त्यांनी अन्य डॉक्टर बंधूंच्या सहकार्याने येथे “निमा” शाखा सुरू केली.त्या माध्यमातून तालुका व परिसरातील गरजू , गरीब जनतेला विविध रोगांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध शिबिरांचे आयोजन केले. शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाची (सिनिअर कॉलेज) स्थापना केली. या महाविद्यालयात नॅक साठी मार्गदर्शन केले आणि उत्कृष्ट मानांकनही मिळवून दिले.या महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेला अनुदानित मान्यता मिळवण्याचे त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.जवळपास पंचवीस वर्ष या महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचे ते क्रियाशील साक्षीदार आहेत.

 

 

1991 पासून ते येथील यशवंत विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाचे चेअरमन आहेत.येथील कनिष्ठ महाविद्यालयात किमान कौशल्य विभागाला मान्यता मिळवून देणे, इमारत निर्मिती इ कामातही ते यशस्वी झाले आहेत. दर्जेदार पूर्वप्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर याची या परिसरातील गरज ओळखून येथे सरस्वती विद्या मंदिराची स्थापना झाली त्यातही त्यांचे योगदान आहे. अलीकडे माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ संदीप पाटील यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले असून ते या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.या शाळांना नियमितपणे भेटी देऊन प्रगतीवर लक्ष ठेवण्याचे काम ते आजही करतात.

 

 

डॉ एस आर पाटील म्हटले की डोळ्यासमोर येते- मराठा विकास मंडळ आणि त्यासाठी त्यांनी केलेले कार्य.या मंडळाचे ते सतत तीस वर्षे अध्यक्ष होते.तिथे त्यांनी सभा मंडप उभारला; समाजासाठी उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थांचा गौरव करण्याची उज्ज्वल परंपराही सुरु केली. समाजात वधू वर सुचक मेळावे आणि सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. तामसवाडी जवळच्या श्री क्षेत्र ओंकारेश्वर या संस्थेतही ते कार्यरत आहेत.याच नावाने म्हणजे “श्री ओंकारेश्वर ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था” या नावाने त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी संस्थेची स्थापना केली आहे. 1995 पासून असंख्य विधायक उपक्रम त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून राबवले आहेत.ज्येष्ठ नागरिकांचा मूलभूत प्रश्न म्हणजे आरोग्याचा हे ओळखून त्यांनी विविध आरोग्य शिबिर यांचेही यशस्वीरित्या आयोजन केले आहे.

 

सामाजिक कार्य करीत असतांना त्यांनी असंख्य कुटुंबातील छोट्या मोठ्या कुरबुरी मिटविण्यासाठी आणि त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केलेली अनेकांनी अनुभवली आहे.त्यात कुठेही कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन एप्रिल 2009 मध्ये मुक्ताईनगर येथे झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर 2015 मध्ये सकाळ वृत्तपत्राच्या वर्धापन दिन प्रसंगी भुसावळ येथे ज्येष्ठ नागरिक गौरव चिन्ह प्रदान करण्यात आले. 2017 मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक जालींदर सुपेकर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तर 2018 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

सतत कार्य करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली आहे.त्यांचे वडील श्री रामभाऊ उघडू पाटील वयाच्या 94 व्या वर्षीही संत मुक्ताई संस्थानच्या वारीतून पायी पंढरपूर येथे आषाढी एकादशीला गेले होते.निर्व्यसनी असल्याने आणि नियमितपणे फिरायला जाणे सुरू असल्याने त्यांची प्रकृती आजही ठणठणीत आहे.

: दिलीप वैद्य

Add Comment

Protected Content