जळगाव प्रतिनिधी । जुन्या वादातून गोळीबारासह चाकूहल्ल्यात जामीनावर सुटलेला संशयित गुन्हेगार धम्मप्रिय मनोहर सुरडकर हा तरूणाचा खून केल्याची घटना काल नशिराबाद येथे घडली होती. या गुन्ह्यातील शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय-२१) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय-२१) दोन्ही रा. पंचशिल नगर यांना आज सकाळी ५ वाजता नशिराबाद पोलीसांनी अटक केली. दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर (वय-२०) रा. पंचशील नगर भुसावळ हा वडिल मनोहर सुरडकर यांच्यासह मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी जळगाव येथून भुसावळ येथे दुचाकी क्रमांक (एमएच १९ एव्ही ९६५६) जात असताना सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास शमीर आणि रेहानुद्दीन यांनी गोळीबार आणि चॉपर हल्ला केला. हल्ल्यात धम्म सुरडकर हा जागीच ठार झाला होता. तर सोबत असलेले वडील मनोहर आत्माराम सुरडकर हे गंभीर जखमी झाले होत. त्यांना जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे.
दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण भुसावळ शहरातील पंचशील नगरात ११ ऑक्टोबर २०२० रोजी मदिना मशिदीजवळील रहिवासी मोहम्मद कैफ शेख जाकीर (वय २७) हा आपल्या आई-वडील आणि भावसह रात्री जेवण करून घरासमोर बसला होता. या वेळी पाच जणांनी मोहम्मद कैफ यास शिवीगाळ करीत चपटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने मोहम्मद कैफ याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात गंभीर दुखापत होऊन मोहम्मद याचा मृत्यू झाला होता. तर मोहंमदच्या अंत्यसंस्काराप्रसंगी त्याचा भाऊ समीर याने आपण हत्येचा बदला घेणार असल्याची जाहीर प्रतिज्ञा केली होती.
यात गुन्ह्यात तो गेल्या ११ महिन्यांपासून कारागृहात होता. मंगळवार २१ सप्टेंबर रोजी त्याची जामीनावर भुसावळ न्यायालयाने सुटका करण्यात आली होती. त्याचे वडील मनोहर हे भुसावळ न्यायालयातून जामीनाची आर्डर घेवून जळगाव कारागृहात आले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगावातून भुसावळ जाण्यासाठी मुलगा धम्म याला घेवून नशिराबाद मार्गे निघाले. दरम्यान, आगोदरच पहारा ठेवून असलेले समीर आणि रेहानुद्दीन यांनी पितापुत्राला नशिराबाद पुलाखाली अडविले. समीरने धम्मवर गोळीबार करून जागीच ठार केले तर रेहानुद्दीन याने मनोहर सुरळकर यांच्यावर चॉपर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. धम्म हा जागीच ठार झाल्याचे पाहून दोघे संशयित आरोपी घटनास्थाळून पसार झाले.
घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. आज बुधवार २२ सप्टेंबर रोजी धम्मच्या मृतदेहावर जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांवर मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज बुधवार २२ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलीसांनी संशयित आरोपी शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय-२१) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय-२१) दोन्ही रा. पंचशिल नगर यांना अटक केली. न्यायालयाने दोघांना २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.