जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावातून तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या तिन्ही मुली नगर जिल्ह्यात सुखरूप आढळल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील एकाच घरातील ३ मुली गुरुवारी एकाच वेळी बेपत्ता झाल्याने तालुक्यासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. या मुलींचा शोध सुरू असतांना प्रारंभी कोणताही पुरावा नव्हता. दरम्यान, या तिघींना कुणी तरी फुस लाऊन पळवून नेल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले या मुलींमध्ये दोन सख्ख्या बहिणी व एका चुलत बहिणीचा समावेश होता.
दरम्यान, या मुली नगर जिल्ह्यातील केडगाव येथे असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. यावरून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या मुलींना पहूर पोलिस ठाण्यात हजर केले असता त्यांना जळगावच्या महिला बालविकास विभागाकडे जबाबासाठी रवाना केले आहे.