जामनेर प्रतिनिधी | राजकारणात शिवसेना आणि भाजपमधील विरोध हा टोकावर पोहचला असतांनाच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, राजकारणात राजकीय वैमनस्य आणि वैयक्तीक संबंध या दोन स्वतंत्र बाबी असतात. विरोधात असूनही अनेक नेते हे एकमेकांशी सलोख्याने वागतात. खरं तर विरोधाच्या ठिकाणी विरोध हवाच, तर वैयक्तीक बाबींमध्ये आत्मीयता हवीच अशी अनेक उदाहरणे मोठ्या नेत्यांनी दाखवून दिली आहेत. याचाच एक अध्याय आज जामनेरात घडला आहे.
आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे अतिवृष्टी आणि चक्रीवादळाने नुकसान झालेल्यांची पाहणी करण्यासाठी जामनेर तालुक्याच्या दौर्यावर आहेत. या दौर्याच्या प्रारंभी ना. गुलाबराव पाटील यांनी आ. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी आ. गिरीश महाजन आणि नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आजी-माजी पालकमंत्र्यांनी नाश्ता करतांना गप्पा केल्या. यात राजकीय नव्हे तर वैयक्तीक हास्यविनोदासह वैयक्तीक चर्चा झाली. यानंतर पालकमंत्र्यांचा ताफा अतिवृष्टीग्रस्तांची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील ओझर, तोंडापूर आदी गावांकडे रवाना झाला.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शिष्टाचाराचे पालन करून तालुक्याचे आमदार म्हणून गिरीश महाजन यांच्यासोबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यात दौर्यात शिवसेना व भाजपसह राष्ट्रवादी व अन्य पक्षांचे नेते व पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यात अतिशय सौहार्दाचे संबंध असल्याचे आधी देखील दिसून आले आहे. या अनुषंगाने आज मंत्र्यांनी आमदार महाजन यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट ही पूर्णपणे अनौपचारीक असल्याचे स्पष्ट आहे. या भेटीप्रसंगी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीसह सर्व पत्रकारांची उपस्थिती देखील होती. मात्र सध्याच्या राजकीय स्थितीत व विशेष करून जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचा विचार करता आजी-माजी मंत्र्यांचे भेटणे हे नक्कीच चर्चेचा विषय होणार असल्याचे दिसून येत आहे.