एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील सध्याची पाणीटंचाई पाहता पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे. अंजनी धरणातील मृत साठा अत्यल्प असल्याने धरणात असलेल्या वनस्पती सडून पाणी दूषित झाले आहे. त्यातच शहरात होणारा पाणीपुरवठा पाणी शुद्धीकरण तर सोडाच साधा फिल्टरही न करता केला जात आहे. त्यामुळे नागरिक ते पाणी पिण्यास कचरत आहेत. त्यातच पाणी विक्रेते लोकांची गरज बघून प्रमाणित पाण्याच्या नावाखाली सर्रास अप्रमाणित पाण्याची विक्री करीत आहेत. त्याबद्दल ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा पैसेही उकळत आहेत.
शहरात व तालुक्यात सुमारे १०० ते १२५ फिल्टर पाण्याचे कारखाने असुन या ठिकाणी पाणी फिल्टर न करता फक्त थंड करून अवाजवी भावाने सर्रास विक्री करत आहेत. एक कारखाना दररोज सुमारे चार हजार लिटर पाणी विक्री करीत आहे. सदर पाणी जारच्या माध्यमातून चारचाकी वाहनातून शहरातील गल्ली बोळात पाणी विक्री केली जात आहे. यातील काहींकडे तर पाणी विक्रीचा परवानाही नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून नागरिकांना डायरिया, टायफाईड अशा विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. सदर पाणी प्रशासकीय कार्यालयांमध्येही पिण्यासाठी वापरले जात आहे, पण या प्रकाराकडे प्रशासनाचीही डोळेझाक दिसून येत आहे. या विक्रेत्यांना जर कोणी सुज्ञ नागरिकांनी टी.डी.एस बद्दल किंवा पाण्याच्या क्षमतेबद्दल विचारले तर ते उडवाउडवीची उत्तरे देऊन पाणी देण्यास नकार देतात. मात्र टंचाई असल्याने नागरिकांना हे पाणी नाईलाजास्तव घेणे भाग पडत आहे. या प्रकाराकडे जिल्हा अन्नभेसळ विभागाने त्वरित लक्ष घालून नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या या कारखाना धारकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांचेशी संपर्क साधला असता, परवानगी देण्याचे अधिकार महसुल प्रशासनाला नाहीत. तसेच पाण्याच्या शुद्धतेबाबत तपासणी करण्याचे अधिकारही अन्न व औषध प्रशासनास असल्याचे त्यांनी सांगितले.