शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिन्याभरात ११४ रुग्णांवर मोफत उपचार

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाविरहित रुग्णसेवा सुरु झाली आहे. यात  गेल्या महिन्याभरात एकूण ११४ रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात आले आहेत.  

 

गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत याकरिता महात्मा ज्योतिबा  फुले जन आरोग्य योजना सुरु झालेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनानेदेखील जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. योजनेसाठीचे कार्यालय रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागात असून येथे  डाटा एंट्री ऑपरेटर सह नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. योजनेमधून २२ जुलै ते २६ ऑगस्टपर्यंत कोरोनाविरहित ११४ रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये वर्षभरात किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, महिलांच्या गर्भाशयाच्या समस्या, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डेंग्यू, डायलिसिस आदी आजाराने ग्रस्त रुग्णांना तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनादेखील लाभ झाला आहे.

योजनेचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश रामानंद, सदस्य सचिव तथा उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील, संदीप माळी, तेजस वाघ  हे  रुग्णांसह नातेवाईकांना सहकार्य करून माहिती देत आहेत. ज्या रुग्णांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी रुग्णालयातील कार्यालयात अथवा अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव (८७६७३३७८१५) यांना संपर्क करावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

 

Protected Content