जळगाव प्रतिनिधी | नारायण राणे यांच्या वक्तव्याने आक्रमक झालेल्या जळगावातील शिवसैनिकांनी थेट भाजपच्या कार्यालयावर धडक दिली. येथे पोलीस बंदोबस्त असल्याने शिवसैनिकांनी कार्यालयाच्या समोरच जोरदार आंदोलन केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले असून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक, महाड आणि पुणे येथे राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या पाठोपाठ आता जळगावातील शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर ठिकठिकाणी जोरदार आंदोलने करण्यात आली.
दरम्यान, जिल्हा शिवसेनेतर्फे महापालिकेच्या समोर जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हा परिषदेजवळ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वसंत स्मृती या कार्यालयावर घोषणाबाजी करून धडक दिली. मात्र तेथे आधीच कडक पोलीस बंदोबस्त असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या बाहेरच जोरदार घोषणाबाजी केली. येथे नारायण राणे यांच्या प्रतिमेला चपलांचा मार देण्यात आला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमकतेने येथे आंदोलन केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त राखल्याने काही अनर्थ झाला नाही.
खालील व्हिडीओत पहा शिवसैनिकांनी केलेले आंदोलन