धरणगाव प्रतिनिधी । अमळनेरमधील राड्यानंतर धरणगाव येथील महायुतीच्या बैठकीकडे तालुक्यातील तीन महत्वाच्या नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. यामुळे उन्मेष पाटील यांच्या डोकेदुखीत वाढ होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मागील साडेचार वर्षात भाजपा व शिवसेनेतील सत्ता स्थापनेपासूनच ओढाताणीचे राहिले आहेत. या दोघा पक्षातील युती तशी सर्वात जुनी व अखंडित राहिलेली असली तरी जळगाव लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपातील नेत्यांमध्ये फारसा एकोपा बघावयास मिळालेला नाहीय. त्यामुळे आजतागायत या दोन्ही पक्षातील सांधा जुळू शकलेला नाही. अलीकडे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक ही दरी सांधण्याचा प्रयत्न केला असला तरी धुम्मस मात्र कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगाव ग्रामीणमध्ये नुकताच झालेला युतीच्या मेळाव्यात हा बेबनाव अधिक प्रकर्षाने दिसून आला. शिवसेना उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्याशी असलेल्या टोकाच्या मतभेदामुळे भाजपचे तीन प्रमुख पदाधिकारी संयुक्त मेळाव्याला अनुपस्थित असल्याची चर्चा आहे. परंतु यामुळे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांचे टेन्शन मात्र, वाढलेले आहे.
भाजप-शिवसेनेचे रावेर व जळगाव या दोन्ही मतदार संघात विधानसभानिहाय मेळावे सुरु आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघात देखील नुकताच युतीचा मेळावा झाला. परंतु या मेळाव्यात भाजपचे पी.सी.पाटील, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे आणि जेष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील हे अनुपस्थित होते. यातील सुभाष पाटील हे कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे गैरहजर असल्याचे कळते. मात्र, पी. सी. पाटील व चंद्रशेखर अत्तरदे यांच्या गैरहजेरीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाहीय.
शिवसेना उपनेते ना.गुलाबराव पाटील व भाजपचे नेते पी.सी. पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या दोघांमधील वादामुळे अनेकवेळा कार्यकर्ते एकमेकाला भिडलेले आहेत. राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांचा २००९ मध्ये विधानसभेतील मार्ग पी.सीं.च्या मदतीनेच सुकर झाल्याची बाब आधीच सर्वांनी अनुभवली आहे. तर नामदार पाटील यांनी याचा बदला पी.सी.पाटील यांच्या धर्मपत्नी वैशाली पाटील यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत करून घेतला. यावेळी वैशाली पाटील या निवडून आल्या असत्या तर, जिल्हा परिषद अध्यक्षपदावर त्यांचा प्रबळ दावा सर्वात मोठा राहिला असता. मात्र झेडपीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पी.सी. हे पराभवाची परतफेड करण्यासाठी विधानसभेची आतुरतेने वाट बघत असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील त्यांची अनुपस्थिती या चर्चेला फोडणी देणारी ठरली आहे.
गुलाबराव पाटील आणि पी.सी. पाटील या दोन्ही नेत्यांमधील वादाला चावलखेडे येथील हायस्कूलमधील सत्ता संघर्षाची किनारदेखील आहे. एकंदरीत ना.पाटील यांच्याशी असलेल्या मतभेदामुळेच पी.सी.पाटील मेळाव्याला गैरहजर राहिले असावेत, अशी देखील चर्चा आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ते नाथाभाऊंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी नाथाभाऊंनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. त्यांच्या समर्थकांनीही आपले पत्ते अजून खुले केलेले नाहीत. राजकीय निरिक्षकांमध्ये ही वादळापुर्वीची शांतता तर नव्हे ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
तर दुसरीकडे, साळवा-नांदेड गटातील भाजपच्या जिल्हापरिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांचे पती भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी अलीकडेच ना.पाटील यांच्यावर नुकतेच गंभीर आरोप लावले होते. त्यामुळे शिवसेनेने धरणगावात बैठक घेत भाजपचा प्रचार करणार नसल्याचा ठराव पारित करून घेतला होता. म्हणूनच अत्तरदे हे देखील मेळाव्यास मुद्दाम गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. अत्तरदे यांनी शिवसेना नेत्यांवर लावलेल्या गंभीर आरोपामुळे या मेळाव्याला स्थानिक शिवसेना पदाधिकारी गैरहजर राहतील असा कयास होता. परंतु उलट भाजपचेच पदाधिकारी गैरहजर राहिल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना जुळवून घ्यायला तयार आहे. परंतु भाजपचेच पदाधिकारी जुळवून घ्यायला तयार नसल्याचे चित्र यातून निर्माण झाले आहे. यामुळे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत मात्र वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आता शेवटच्या टप्प्यात हे डॅमेज कंट्रोल करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.