काबुल : वृत्तसंस्था । काबूलमध्ये प्रवेश केल्यानंतर तालिबानने भारतासोबत सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे देशातून होणारी आयातही रोखण्यात आली आहे.
“आम्ही अफगाणिस्तानमधील घडामोंडीवर बारीक लक्ष ठेवून होतो. पाकिस्तानमार्गे सर्व निर्यात होत होती. सध्याच्या घडीला तालिबानने पाकिस्तानला जाणारी कार्गो वाहतूक रोखली आहे. यामुळे आपोआप आयातही रोखली गेली आहे,” असं ते म्हणाले आहेत. भारताचे अफगाणिस्तानसोबत व्यापार आणि गुंतवणुकीच्या बाबतीत फार जुने संबंध आहेत.
“आम्ही अफगाणिस्तानच्या सर्वात मोठ्या भागीदारांपैकी एक आहोत. २०२१ मध्ये आम्ही कोट्यवधींची आयात आणि निर्यात केली आहे. फक्त व्यापारच नाही तर आम्ही अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक केली आहे. आम्ही तीन बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली असून अफगाणिस्तानात जवळपास ४०० प्रकल्प सुरु आहेत,” अशी माहिती अजय सहाई यांनी दिली आहे.
पुढे म्हणाले की, “काही गोष्टी आंततरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण मार्गे निर्यात होत असून त्या सुरळीत आहेत. दुबईमार्गे होणारी आयातही सध्या सुरळीत आहे”. अजय सहाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्यातीमध्ये चहा, कॉफी, साखर, औषधं, मसाले यांचा समावेश असून आयातीमध्ये जास्त करुन ड्राय फ्रूट्सचा समावेश आहे.
दरम्यान अफगाणिस्तानात परिस्थिती बिघडली असतानाही व्यावसायिक नातं पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होईल अशी अधिकाऱ्यांना आशा आहे. “वेळेसोबत अफगाणिस्तानलाही विकास करण्यासाठी व्यापार एकमेव मार्ग असून व्यापार सुरु ठेवतील याची मला खात्री आहे,” असं ते म्हणाले आहेत.
अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सुकामेव्याच्या मिठायांच्या किमतीही वाढणार आहेत. अफगाणिस्तानातून प्रामुख्याने जर्दाळू, अंजीर, छोटे पिस्ते आणि अक्रोडचा पुरवठा भारतासह इतर देशांना होतो. साधारणपणे ऑगस्टअखेर, सप्टेंबरमध्ये नवे पीक हाती येते. त्यावेळी भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सुकामेव्याची खरेदी होते. मात्र, सध्या अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सणासुदीच्या दिवसांत सुकामेवा आणि त्यापासून बनवलेल्या मिठायांना भारतात मोठी मागणी असते. मात्र, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास या कालावधीत किमती वाढण्याची शक्यता आहे.
स्वयंपाकात वापरण्यात येणारे हिंग तयार करण्यासाठीचे मूळ साहित्य आणि शहाजिरे याचाही पुरवठा अफगाणिस्तानातून होतो. मात्र, त्याची मागणी आणि वापर तुलनेने मर्यादित असतो. मात्र, या पदार्थांचा पुरवठा आणि किमतींवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानमधून सुमारे ३८ हजार टन सुकामेव्याची भारतात आयात होते. गेल्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) भारताने ३७५३.४७ कोटींचा माल अफगाणिस्तानातून आयात केला. त्यापैकी २३८९ कोटी रुपये सुकामेव्यासाठी होते.