भडगाव : प्रतिनिधी । पालकमंत्री ना गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यांनी मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर सविस्तर चर्चा करून मागण्या मान्य करीत त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी जुवारडीच्या ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण मागे घेतले
जुवार्डी ग्रामस्थांचे 15 ऑगस्टपासून विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही उपोषण कर्त्यांची तब्बेत बिघडली होती. उपोषणकर्त्यांचे वजन कमी झाले होते. त्यामुळे प्रशासन हादरले होते.
दोन दिवसांपूर्वी खा. उन्मेष पाटील यांनी आश्वासन देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तीन मागण्या जिल्हा परिषद प्रशासनाशी संबधित असतानादेखील जिपकडून कोणीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे उपोषण कर्त्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. भडगावचे तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, गट विकास अधिकारी आर. ओ . वाघ, वनविभागाचे उपवनसंरक्षक व वनक्षेत्रपाल उपोषणकर्त्याच्या सतत संपर्कात राहून उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी गट विकास अधिकारी आर. ओ . वाघ, पोलीस निरीक्षक उतेकर, वनक्षेत्रपाल यांनी उपोषणकर्ते व ग्रामस्थांसोबत प्रदीर्घ चर्चा केली. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला गेल्यामुळे उपसरपंच पी. ए. पाटील यांनी मुबई गाठली. आमदार किशोर पाटील यांनी जुवार्डीकरांचा जिव्हाळ्याचा पाझर तलाव क्रमांक 3 व विविध प्रश्न सोडवले असल्यामुळे पी. ए. पाटील यांनी आ. किशोर पाटील यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. आ. किशोर पाटील यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी मुबंईला मंत्रालयात सविस्तर चर्चा केली. गावात बैठक सुरू असताना गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपोषणकर्त्यांशी संवाद साधला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ. किशोर पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जुवार्डीकरांशी चर्चा करून सगळ्या समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन दिले. जुवार्डीच्या ग्रामस्थांसोबत लवकरच जळगांव येथे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा परिषद प्रशासनावर विश्वास नसल्यामुळे नजीकच्या काळात प्रश्न सुटले नाही तर पुढील उपोषण जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात येईल असे उपोषणकर्त्यांनी कळवले आहे. चर्चेअंती खा. उन्मेष पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेण्याचे ठरले. पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, गट विकास अधिकारी आर. ओ . वाघ , वनक्षेत्रपाल यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण मागे घेण्यात आले.