मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर आ. चंद्रकांत पाटलांचे जलसमाधी आंदोलन मागे ( व्हिडीओ)

वरणगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांनी जलसमाधी आंदोलन सुरू असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सात दिवसात पाणी टाकण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यामुळे आपण आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ओझरखेडा साठवण तलावात तापी नदीतील पाणी टाकण्याबाबत विलंब होत असल्याच्या निषेधार्थ आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसैनिक आणि शेतकर्‍यांसह जलसमाधी आंदोलन केले. सुमारे दोन तास आमदार हे आंदोलकांसह पाण्यात होते. यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता, त्यांनी याबाबत सात दिवसात तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

दरम्यान, आंदोलन मागे घेतल्यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेत ओझरखेडा येथे साठवण धरण बांधण्यात आले आहे. यात गेल्या तीन वर्षात पाणी टाकण्यात आले होते. मात्र यंदा पाणी टाकण्यात आले नाही. जल पातळी खालावल्यामुळे १० जून रोजी आम्ही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तापी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. मात्र दोन महिने उलटून गेल्यानंतरही कार्यवाही न झाल्याने आपण हे आंदोलन केले. हे आंदोलन तापी महामंडळाच्या निर्ढावलेल्या अधिकार्‍यांच्या विरोधात असल्याचे आमदार पाटील म्हणाले. तर आपण शिवसैनिक असल्याने आंदोलन हा आपला मूळचा स्वभाव असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

दरम्यान, ओझरखेडा धरणात पाणी टाकू नये म्हणून राजकारण होत असल्याचा आरोप देखील आ. चंद्रकांत पाटील यांनी केला. तर वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेतील दुसर्‍या टप्प्याचे काम मार्गी लागावे म्हणून आपण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील आ. पाटील यांनी दिली.

खालील व्हिडीओत पहा आ. चंद्रकांत पाटील यांची आंदोलनाबाबतची भूमिका.

*फेसबुक व्हिडीओ लिंक :*


युट्युब व्हिडीओ लिंक :

 

Protected Content