जळगाव प्रतिनिधी | गेल्या सुमारे महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाचे आज जिल्ह्यात पुनरागमन झाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर हवामान खात्याने येत्या पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
यंदा ऑगस्ट महिना अर्धा उलटून गेल्यानंतरही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली आहे. यातच सुमारे एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताक्रांत बनले होते. या पार्श्वभूमिवर, आज सकाळपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे पावसाला तूर्त जीवदान मिळणार आहे. तर, चांगल्या हंगामासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार ही अपेक्षा देखील पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर-मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.