नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारताचा राष्ट्रीय खेळ म्हटलं की हॉकीचं नाव समोर येतं. पण अधिकृतरित्या या खेळाला राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आलं नसल्याचं म्हणत याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
वकील विशाल तिवारी यांनी सुप्रीम कोर्टात हा अर्ज दाखल केला आहे. याचिकेत ‘अधिकृतरित्या हॉकीला राष्ट्रीय खेळ घोषित करा’ असे निर्देश केंद्र सरकारला द्यावे असं म्हटलं आहे.
भारतात हॉकीला देशाचा राष्ट्रीय खेळ असल्याचं म्हटलं जात. तसंच प्रत्येकाला माहित आहे. पण मूळात सरकारने अद्यापर्यंत हॉकीला अधिकृतरित्या असं घोषित केलेलं नाही. हॉकी भारतातील एक महान खेळ असून सरकारकडून हवा तसा सपोर्ट हॉकीला मिळालेला नाही. केंद्र सरकारने ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांना शाळा आणि महाविद्यालयात प्रमोट करण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.
भारतचा राष्ट्रीय खेळ कोणता? यावर अनेकदा अनेक प्रश्न उठतात. पण मूळात भारताचा कोणताच राष्ट्रीय खेळ नसल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. मार्च, 2021 मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपुर येथील एका लॉ शिकणाऱ्या विद्यार्थ्याने माहिती अधिकाराद्वारे खेळ मंत्रालयाकडून मागितलेल्या माहितीनंतर ‘भारत सरकारने सर्व खेळांना समान वागणूक देण्यासाठी कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ घोषित केला नसल्याचं म्हटलं होतं.