जळगाव प्रतिनिधी । पोलीस हा अतिशय महत्वाचा घटक असतांनाही त्यांच्या बळकटीकरणासाठी निधी मिळण्यात अडचणी येत असल्या तरी यावर मात करण्यासाठी आपण प्रयत्न करू. खरं तर पोलीस आपल्या सुरक्षेची काळजी घेत असतांना त्यांची देखील काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पोलीस दलास १५ बोलेरे आणि ३९ होंडा शाईन दुचाकी प्रदान करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने आज जिल्हा पोलीस दलास १५ बोलेरो तर ३९ होंडा शाईन वाहने प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापौर जयश्री महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही वाहने पोलीस दलाकडे सुपुर्द करण्यात आली.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोरोनाची आपत्ती असतांनाही पोलीस प्रशासनाला वाहनांची असणारी गरज लक्षात घेऊन आपण जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधीला मान्यता दिली. तसेच जिल्हाधिकार्यांनीही याला परवानगी दिली. तसेच आजपासून १०० ऐवजी ११२ या क्रमांकावर आता आपत्कालीन सुविधा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पोलीसांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. आज पोलीस दलास वाहने मिळाली असली तरी त्यांच्या सर्वच अडचणी दूर होतील असे नाही. तथापि, नवीन वाहनांमुळे पोलीस प्रशासनाला यामुळे चांगली सेवा प्रदान करता येणार आहे.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, अगदी लहान-सहान गावांमध्येही पुलांच्या कामांसाठी मोठा निधी मिळत असतो. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणार्या पोलीस दलाला निधी मिळतांना अडचणी येत आहेत. मात्र यावर मात करून पोलीस प्रशासनाला नियमीतपणे निधी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जे आपल्या सुरक्षेची जबाबदारी घेतात, त्यांची काळजी घेण्याची देखील आवश्यकता आहे. याआधी देखील वाहने देण्यात आली असून उर्वरित वाहने आज प्रदान करण्यात येणार आहे. आगामी काळातही डीपीडीसीच्या माध्यमातून पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.