सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | येथील हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबारमध्ये रात्री चोरट्यांनी डल्ला मारून पूर्ण दारू व बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
याबाबत वृत्त असे की, सावदा येथे महामार्गाला लागूनच हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबार आहे. या हॉटेलच्या उत्तरेच्या बाजूस असणार्या खिडकीला तोडून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला. यानंतर येथून हॉटेलमध्ये असणारे दारू आणि बीयरचे संपूर्ण बॉक्सेस आणि बाटल्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.
आज पहाटे ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. याची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून तपासाला प्रारंभ केला आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, यात काही लाख रूपयांची दारू व बीयर चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.