जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील कडगाव येथील मूळ रहिवासी असणारे कवि नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कविता या काव्यसंग्रहाला श्री संत मुक्ताई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
उस्मानाबादचे अक्षर मानव व श्री संत मुक्ताई मंदिराचा सन २०२०चा श्री संत मुक्ताई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. जळगाव तालुक्यातील कडगावचे कवी नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कविता या काव्यसंग्रहाची यंदाच्या या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांनी या काव्यसंग्रहात भवताल मांडला आहे. १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल, असे आयोजकांनी कळवले आहे.
नामदेव कोळी हे प्रतिभावंत कवि म्हणून ओळखले जात असून त्यांच्या वाघूर या दिवाळी विशेषांकांने साहित्य विश्वात मानाचे स्थान मिळवले आहे. श्री संत मुक्ताई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.