जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथे भोईवाडा परिसरात रात्री झालेल्या तुफान दगडफेकीत तीन जण जखमी झाले असून पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, येथील इंदिरा चौक परिसरात शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जमावाने तुफान दगडफेक केली. यात विनोद मोतीलाल भोई, चेतन छोटू भोई, मंदाबाई अशोक भोई (रा. भोईवाडा, नशिराबाद) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस निरीक्षक समाधान कुंभार, तहसीलदार नामदेव पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षकांनी परिसराची पाहणी करुन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या प्रकरणी पोलिसांनी ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.