जळगाव प्रतिनिधी । जून महिना पूर्ण होत असला तरी समाधानकारक पाऊस नसतांनाच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अजून एक आठवडाभर जोरदार पाऊस होणार नाही. यामुळे शेतकर्यांची चिंता वाढणार आहे.
मे महिन्याच्या पूर्वार्धात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाने तडाखा दिला होता. यामुळे मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये मोठी आर्थिक हानी झाली होती. यातून सावरत शेतकर्यांची नजर आभाळाकडे लागली होती. मृग नक्षत्र लागल्यानंतर काही भागांमध्ये पाऊस झाला असला तरी अद्यापही पुरेसे पर्जन्यमान नसल्यामुळे बहुतांश ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. तर, गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
दरम्यान, शेतकर्यांची चिंता वाढवणारी एक माहिती हवामान खात्याने जाहीर केली आहे. राज्यात पुढे आठ दिवस मान्सूनचा प्रभाव कमी जाणवेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सॅटेलाईट आणि रडारच्या आधारे घेण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकणात पुढील तीन ते चार तासात पाऊस हजेरी लावेल. तर अन्य भागांमध्ये मात्र याचा प्रभाव फारसा राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून तुरळक सरी पडण्यापलीकडे फारसा पाऊस झालेला नाही. हे चित्र पुढील आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नाही, असं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे. यामुळे दमदार पावसासाठी एक आठवडा वाट पहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.