शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चौघांवर मणक्यांच्या आजारावर मोफत शास्त्रक्रीया

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंगोपचार विभागामध्ये चार गरजू व गरीब रुग्णांवर देशातील नामवंत व मुंबई येथील प्रसिद्ध मणका विकार तज्ज्ञ व त्यांच्या वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल व जळगाव जिल्ह्यातील गरिबांना सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबईच्या पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी आभार मानले आहे.

मणक्याचे आजार : निदान व उपचार याविषयी विशेष शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे घेण्यात आले होते. गरीब, गरजू व आदिवासी-दुर्गम भागातील रुग्णांनी तपासणी केली होती. या तपासणीतून ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासली अशा चार रुग्णांची शस्त्रक्रिया रुग्णालयात करण्यात आली आहे. ह्या शस्त्रक्रिया मुंबई येथील स्पाईन फाउंडेशनच्या टीमने केल्या आहे. शस्त्रक्रियेत दोन पुरुष व दोन महिला रुग्णांचा समावेश होता.

शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुख डॉ. जोतीकुमार बागुल, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. पंकज घोगरे, डॉ. आदित्य जाधव, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. प्रणव समरुतवार, डॉ. सचिन वाहेकर,  भुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. राजेश सुभेदार,  शस्त्रक्रियागृहाच्या इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी आदींनी सहकार्य केले.

Protected Content