नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी १५ एप्रिलला भारतीय संघाची घोषणा होणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात पुढील सोमवारी मुंबईत बैठक होणार आहे. त्यानंतर १५ सदस्यीय संघाची घोषणा होईल. वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघात कुणाला स्थान मिळेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये ३० मे रोजी होणार आहे. तर अंतिम लढत १४ जुलैला होणार आहे. दोनदा विश्वविजेत्या ठरलेल्या भारताचा संभाव्य संघ निश्चित मानला जात असला तरी, चौथ्या क्रमांकासाठी कोणत्या खेळाडूला संधी द्यावी, या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होऊ शकते. या स्पर्धेत भारताची पहिली लढत दक्षिण आफ्रिकेसोबत ५ जूनला होणार आहे.