खोदकामात सापडला जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पूर्व आफ्रिकेमधील बोत्सवाना देशामध्ये जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक हिरा सापडला आहे.

 

हा हिरा एका ठिकाणी खोदकाम सुरु असताना सापडला असून तो जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा ठरलाय. हिरे शोधणाऱ्या देबस्वाना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा हिरा १ हजार ९८ कॅरेटचा आहे.

 

देबस्वानाचे प्रबंध निर्देशक लयनेट आर्मस्ट्रँग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवत्तेच्या आधारे हा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा आहे. हा दुर्मिळ आणि खूप खास असणारा हिरा देशातील हिऱ्यांशी संबंधित उद्योग आणि बोत्सवानासाठी फार महत्वाचा असल्याचंही आर्मस्ट्रँग यांनी म्हटलं आहे. हा नवीन हिरा सध्या कोरोना परिस्थितीमुळे फार संघर्ष करत असणाऱ्या आमच्या देशाला नवीन ऊर्जा देईल अशी अपेक्षा आर्मस्ट्रँग यांनी व्यक्त केली आहे. या हिऱ्याला अद्याप नाव देण्यात आलेलं नाही

 

देबस्वाना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा हिरा ७३ मिलीमीटर लांब आणि ५२ मिलीमीटर रुंद आहे. आमच्या कंपनीच्या इतिहासातील हे आतापर्यंतचं सर्वात मोठं यश आहे असंही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. देबस्वाना कंपनीची स्थापना बोत्सवाना सरकार आणि हिऱ्यांसाठी ओळखली जाणारी जागतील आघाडीची कंपनी असणाऱ्या डी बीयर्सने एकत्र येऊन  केली  आहे.

 

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये १०९५ साली जागतील सर्वात मोठा हिरा सापडला होता. हा हिरा ३ हजार १०६ कॅरेटचा होता. जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा हा टेनिस बॉलच्या आकाराचा आहे. हा हिरा सुद्धा २०१५ मध्यो बोत्सवानामध्येच सापडला होता.

 

जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा हा ११०९ कॅरेटचा होता. त्याला लेसेडी ला रोना असं नाव देण्यात आलेलं. हिरे निर्मिती क्षेत्रात बोत्सवाना हा आफ्रीकेमधील आघाडीचा देश आहे. हिरा मिळाल्याने बोत्सवाना सरकारला मोठा दिलासा मिळालाय. देबस्वाना कंपनी हा हिरा विकण्याचा विचार करु शकते. या हिऱ्याची विक्री झाल्यास त्यापैकी ८० टक्के रक्कम ही सरकारच्या तिजोरीमध्ये जाईल. हिऱ्यांची मागणी कमी झाल्याने बोत्सवाना आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे या हिऱ्याला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.

 

Protected Content