मोदी सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत असल्याची अमेरिकेत टीका

 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था । भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश  असला तरी मोदी सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत असल्याचे अमेरिकेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींना सांगितले आहे.

 

अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील निर्बंध हे त्यापैकी एक चिंतेचे कारण आहे.

 

दक्षिण आणि मध्य आशियाचे प्रभारी साहाय्यक परराष्ट्रमंत्री डीन थॉम्पसन यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाहीबाबतच्या काँग्रेस उपसमितीमध्ये वरील वक्तव्य केले आहे. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, तेथे कायद्याचे राज्य आहे, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे आणि भारताचे अमरिकेशी चांगले संबंध आहेत, असे थॉम्पसन म्हणाले.

 

तथापि, भारत सरकारने घेतलेले काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील निर्बंध, त्याचप्रमाणे मानवी हक्क कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना ताब्यात घेण्याच्या प्रकारांचा त्यामध्ये समावेश आहे. देशातील नागरी स्वातंत्र्य कमी होत चालले असल्याची टीका परदेशी सरकार आणि मानवी हक्क गटांनी केली असली तरी भारताने यापूर्वी त्याचे खंडन केले आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात पत्रकारांवरील निर्बंधाबाबत अमेरिकेला चिंता आहे तोच प्रकार आता भारतात घडत आहे, असे थॉम्पसन यांनी लोकप्रतिनिधींच्या  प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

 

Protected Content