तिसरी लाट ९८ दिवस राहणार, मोठ्या प्रमाणात लसीकरण हाच पर्याय

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाची तिसरी लाट येऊन गेलेल्या अन्य देशांच्या अभ्यासानंतर भारतातही तिसरी लाट ९८ दिवस टिकू शकते आणि वेगवान लसीकरण हाच वाचण्याचा प्रभावी पर्याय आहे असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात सांगण्यात आले आहे

 

भारतामधील कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेप्रमाणेच अधिक घातक असू शकते. तिसऱ्या लाटेचे देशावर गंभीर परिणाम होतील अशी शक्यता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अहवालामध्ये व्यक्त केलीय. इतर देशांमध्ये तिसऱ्या लाटेत काय घडलं याचा संदर्भ देत भारतामधील यंत्रणांना या अहवालामधून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. इकोरॅप नावाच्या या अहवालामध्ये कोरोना कालावधीत अर्थव्यवस्थेने कशी कामगिरी केली यासंदर्भातही भाष्य करण्यात आलं आहे.

 

एसबीआयच्या या अहावालामध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट १०८ दिवसांपर्यंत होती त्या देशांमध्ये तिसरी लाट सरासरी ९८ दिवसांपर्यंत टीकली. इतर देशांमधील ट्रेण्ड पाहिल्यास तिसऱ्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेपेक्षा १.८ पट अधिक रुग्ण आढळून येतील. जागतिक स्तरावर दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा ५.२ पट अधिक रुग्ण आढळून आले होते. भारतामध्ये मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ४.२ टक्के अधिक रुग्ण आढळून आलेले. ही सरासरी जागतिक सरासरीपेक्षा कमी होती.

 

वेगवेगळ्या देशांमध्ये येऊन गेलेल्या तिसऱ्या लाटांचा अभ्यास केला असता भारतामधील तिसरी लाट अधिक धोकादायक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मात्र  तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी चांगल्या पद्धतीने, सुनियोजित कार्यपद्धतीचा अवलंब करत तयारी करण्यात आली तर या लाटेचा धोका आणि परिणाम कमी करण्यात यश मिळू शकतं, असंही अहवालात म्हटलं आहे. गंभीर प्रकरणांची संख्या तसेच मरण पावणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी पूर्ण तयारीने या लाटेचा सामना करणे गरजेचे आहे, असं अहावालात म्हटलं आहे.

 

आरोग्य व्यवस्था चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मूलभूत सुविधा आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. या दोन गोष्टी केल्यास गंभीर रुग्णांची संख्या २० ते ५ टक्क्यांपर्यंत कमी करता येईल असा विश्वास व्य्कत करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आणि आरोग्य व्यवस्थेला बळकटी दिल्यास परिस्थिती दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक चांगली असू शकते. दुसऱ्या लाटेमध्ये एक लाख ७० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आरोग्य सुविधा आणि लसीकरणाच्या जोरावर तिसऱ्या लाटेतील मृतांची संख्या ४० हजारांवर थोपवता येईल असं एसबीआयच्या अहवालात म्हटलं आहे.

 

तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते असं एसबीआयने  अहवालात म्हटलं आहे. त्यामुळेच अहवालामध्ये जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर भर देण्याची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सर्वात आधी लहान मुलांचे लसीकरण करणं गरजेचं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशामध्ये १५ ते १७ कोटी मुलं ही १२ ते १८ वयोगटातील असून त्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने लसीकरणामध्ये या मुलांना प्राधान्य दिलं जावं, असं एसबीआयने म्हटलं आहे.

 

Protected Content