गोंदीया । जालना पोलिसांनी राजकीय पदाधिकार्याला केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच गोंदियात पोलिसांच्या मारहाणीत कैद्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जालना पोलिसांकडून व्हिडिओ शुटिंग काढण्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला बेदम मारहाण करण्यात आली होती. ही घटना ९ एप्रिल २०२१ रोजी घडलेली असून पदाधिकारी गयावया करत असतांनाही पोलिस त्याला काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर, आता गोंदिया जिल्ह्यातही पोलिसांच्या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, राजकुमार अभयकुमार यांचा २२ मे रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि ४ पोलीस कर्मचार्यांविरुद्ध प्रथमदर्शनी तपास झाल्यानंतर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील आरोपी राजकुमार याला पोलिसांनी लाकडी दांड्याच्या पट्ट्याने मारहाण केली होती. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी पोलिसांवर टीका देखील केली आहे.