फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील पूर्णानंद विनायक पाटील उर्फ पूर्णानंद महाराज याच्या विरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोक्सो कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, फैजपूर येथील पूर्णानंद विनायक पाटील उर्फ पूर्णानंद महाराज नावाच्या धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणार्या विवाहीत व्यक्तीने मंगळवारी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. या मुलीच्या आजोबाच्या दुचाकीच्या विक्रीबाबत हा माणूस गेला असता त्याने मुलीचा विनयभंग केला. तिने तात्काळ याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर त्याला चोप देऊन पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. या अनुषंगाने संबंधीत अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. भुसावळ येथील महिला पोलीस अधिकार्याच्या उपस्थितीत रात्री उशीरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
पूर्णानंद पाटील उर्फ पूर्णानंद महाराज हा परिसरात प्रवचनकार म्हणून ख्यात आहे. त्याने प्रेमविवाह केला असून आधीदेखील तो वादाच्या भोवर्यात सापडला आहे. त्याची आधी देखील याच प्रकारची काही प्रकरणे उघडकीस आली असली तरी मान्यवरांच्या मध्यस्थीते तो गोत्यात आला नाही. मात्र अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे त्याच्या विरूध्द पोक्सो कायद्याचे कलम ८ तसेच भादंवि कलम ३५४-अ आणि ४५२ याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुढील तपास एपीआय प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहिदास ठोंबरे पो को चेतन महाजन करीत आहे.