मुंबई : वृत्तसंस्था । पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकाने अटक केलेल्या दोघांकडे सात किलो युरोनियम आढळून आलं आहे. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २१ कोटी रुपये आहे. युरेनियम दुर्मिळ धातूं आहे. किरणोत्सर्ग करणाऱ्या या धातूचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी केला जातो.
युरेनियम खरेदी करणाऱ्यासाठी कोणी तयार होत आहे का याचा शोध दोन्ही आरोपी घेत असतानाच एटीएसने त्यांच्यावर छापा टाकून युरेनियम जप्त केला
नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असलेल्या युरेनियम बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील नागपाडा येथून दोन जणांना अटक केलीय. या दोघांकडे ७ किलो १०० ग्रॅम युरेनियम आढळून आलं आहे. या युरेनियमची किंमत २१ कोटी ३० लाख रुपये आहे. अणु ऊर्जा कायदा, १९६२ अंतर्गत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एटीएस पथकाने या दोघांकडे आढळलेला पदार्थ प्रयोगशाळेमध्ये चाचणीसाठी पाठवला होता. या चाचणीमध्ये हा पदार्थ नैसर्गिक स्वरुपातील आणि शुद्ध युरेनियम असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींनी त्यांच्याकडील धातू हा युरेनियमच आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी एका खासगी प्रयोगशाळेची संपर्क साधला होता. आता दहशतवादीविरोधी पथकाकडून या प्रयोगशाळेचीही तपासणी केली जाणार असून या प्रयोगशाळेतील व्यक्तींच्या मदतीनेच या दोन्ही आरोपींनी हा घातक पदार्थ आणल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या दोघांकडे एवढ्या मोठ्याप्रमाणामध्ये युरेनियम कुठून आणि कसा आला याचा सध्या शोध घेतला जात आहे.