जळगाव प्रतिनिधी । चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली असून Livetrends Newsने सर्वप्रथम दिलेल्या वृत्तावर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपने खासदार ए.टी. पाटील यांचा पत्ता कट करून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली असली तरी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या उमेदवारीबाबत संशयकल्लोळ सुरू होता. ए.टी. नानांनी त्यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध केला. तर अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनीही त्यांना प्रखर विरोध करून अपक्ष उमेदवारीचा पवित्रा घेतला. यामुळे वाढता विरोध लक्षात घेऊन भाजपच्या श्रेष्ठींनी स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील यांना तिकिट जाहीर केले आहे. यामुळे Livetrends Newsने सर्वप्रथम दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. रात्री उशीरा आमदार उन्मेष पाटील यांना पक्षाकडून अधिकृत निरोप मिळाला असून ते आज जळगावात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज सकाळी आमदार उन्मेष पाटील यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपल्या उमेदवारीबाबत पक्षाकडून अधिकृत सांगण्यात आले असून आपण आजच अर्ज दाखल करत असल्याची माहिती दिली.
दरम्यान, आमदार उन्मेषदादा यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर चाळीसगावात जल्लोषाचे वातावरण निर्मित झाली आहे. तर आमदार पाटील हे आज ४ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांच्या विरूध्द आमदार उन्मेष पाटील असा सामना रंगणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.