पुणे : वृत्तसंस्था । राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम बीएस्सी अॅग्रि (ऑनर्स) या पदवी अभ्यासक्रमाला समकक्ष ठरवण्यात आले आहे.
पदवी अभ्यासक्रमाच्या नावांमध्ये बदल झाल्याने कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या परीक्षा देण्यात अडचणी येऊ लागल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला.
सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कृषी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित के ले आहे. त्यामुळे या पदवी अभ्यासक्रमांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, या नामबदलामुळे कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी येतात. त्यामुळे राज्य शासनाच्या कृषी परिषदेच्या १०४ व्या बैठकीत विविध कृषिपदवी अभ्यासक्रमांना बीएस्सी अॅग्रि अभ्यासक्रमाच्या पदवीच्या समकक्षतेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बीएस्सी अॅग्रि समकक्षतेचा दर्जा मिळालेल्या अभ्यासक्रमांमध्ये बीएस्सी उद्यानविद्या, बीएस्सी वनविद्या, बीएस्सी सामाजिक विज्ञान, बीएफएस्सी (मत्स्य विज्ञान), बीटेक (कृषी अभियांत्रिकी), बीटेक (अन्न तंत्रज्ञान), बीटेक (जैव तंत्रज्ञान), बीएस्सी (एबीएम)/ बीबीएम (कृषी)/ बीबीए (कृषी), बीएस्सी कृषिव्यवसाय व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कृषी शाखेत विविध अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि परीक्षांना अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे राज्यातील विविध कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.