पणजी (वृत्तसंस्था) भारतीय राज्यघटना सर्वाना समान हक्क देते, खानपानाचे, अभिव्यक्तीचे, मतभेदांना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते; मात्र गेल्या काही वर्षात नागरिकांना ते विशिष्ट धर्माचे वा जातीचे असल्याच्या कारणास्तव अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे, अशी नोंद करून अशा प्रकारच्या हिंसेला प्रेरणा देणाऱ्यांना सत्ताभ्रष्ट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन देशभरातील लेखकांनी प्रसारीत केलेल्या निवेदनातून केली आहे. एवढेच नव्हे तर, समाजात दुही निर्माण करणाऱ्या विद्वेषाच्या राजकारणास सत्ताभ्रष्ट करण्यासाठी भारतीय नागरिकांनी यावेळी मोठय़ा संख्येने मतदान करावे, असे आवाहन देखील लेखकांनी मतदारांना केले आहे.
काश्मिरपासून केरळपर्यंतचे २०० हून अधिक लेखक एकत्र आले असून त्यांनी समताधिष्ठित, बहुविध भारतासाठी जनतेने उत्स्फूर्तपणे लोकसभा निवडणुकीचे माध्यम वापरावे, असे प्रसारित निवेदनातून म्हटले आहे. विवेकवादी विचारवंत, लेखक आणि कार्यकर्त्यांमागे अन्वेषण यंत्रणांचा ससेमिरा लावून त्यांना हतोत्साहित करण्याचा डाव हाणून पाडण्याची आवश्यकता व्यक्त करताना येत्या लोकसभा निवडणुकीत या शक्तींना नामोहरम करावे, असे आवाहन या लेखकांनी केले आहे. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करून देशाला दुभंगून टाकण्याचा हेतू या विद्वेषाच्या राजकारणामागे असून लेखक, कलाकार, चित्रकार, सिनेनिर्माते, संगीतकार अशा अनेकांची सातत्याने होणारी सतावणूक हा याच राजकारणाचा परिपाक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. देशात दुहीची बिजे पेरणा-यांना मतदानाद्वारे सत्तेपासून दूर ठेवता येईल असा आशावाद व्यक्त करतानाच राज्यघटनेला अपेक्षित असलेली समाजव्यवस्था राखायची असल्यास देशाच्या ऐक्याच्या निकषावर मतदान करण्याचे आवाहन या लेखकांनी केले आहे. महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या विरोधातल्या कारवाया हाणून पाडण्यासाठी संघटित मतदानाची गरजही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.