जळगाव प्रतिनिधी । जागतिक आरोग्य दिनानिमित्त केसीई सोसायटीच्या मु.जे. महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा ॲण्ड नॅचरोपॅथी तर्फे आज ७ एप्रिल रोजी सकाळी ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात कम्यूनिटी महाविद्यालयाच्या प्राचार्या शैलजा पप्पू यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी १०८ महिला पुरुषांनी नोंदणी करून ८५ आरोग्य प्रेमी महिला पुरुषांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरवात ओंकार प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला विभाग प्रमुख तथा संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी प्रास्ताविकातून आरोग्य दिनाचे औचित्य आणि त्या अनुषंगाने योग- निसर्गोपचार विभागाचे योगदान याविषयी मत व्यक्त केले. आरोग्य दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम या कठीण प्रसंगात आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासन, सुरक्षा आणि स्वछता कर्मचारी यांना समर्पित करीत असल्याचे मतही त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.
आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी विश्रांती आवश्यक असते, आणि विश्रांती म्हणजे केवळ झोप नसून मेंदूला विविध प्रयत्नाच्या माध्यमातून विश्रांत करणे आवश्यक असते, त्यासाठी संगीत ऐकणे, आपला छंद जोपासणे, ध्यान करणे निवांत बसून आपल्या विचारांचे मंथन करणे, आवडत्या व्यक्तीसोबत, नातेवाईकासोबत मन मोकळे करणे, या सर्व बाबी आपल्याल्या तणावमुक्त करण्यासाठी निश्चितच मदत करतात. सोशल मिडीयावर जास्त वेळ न घालवता प्रत्यक्ष संपर्क साधून आपल्या भावना व्यक्त करणे कधीही उत्तम असते असे मतही त्याने व्यक्त केले. आपला दैनदिन आहार- विहार दिनचर्या तसेच आपला प्रत्येक बाबतीतील सकारात्मक दृष्टीकोन आपले जीवन निरोगी ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतो असे मतही त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले.