भडगाव प्रतिनिधी । मतदारसंघात अवकाळी पाऊस व वादळाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश आमदार किशोर पाटील यांनी दिले आहेत.
दि २३ रोजी रात्री भडगाव व पाचोरा तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले. त्यात अंतिम टप्प्यात आलेला रब्बी हंगाम अक्षरश: आडवा पडला. ज्वारी, मका,गहू पिकांचे मोठे नुकसान झाले. तर काही भागात फळ पिकांचे झाडे उन्मळून पडले. त्यामुळे शेतकर्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.
या पार्श्वभूमिवर आमदार किशोर पाटील यांनी आढावा घेत तत्काळ प्रातांधिकारी राजेंद्र कचरे यांना पिकांच्या नुसनाची पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. तालुका कृषी अधिकार्यांना त्यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. पंचनाम्यापासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये असे त्यांनी सांगीतले. त्यानुसार आज सकाळीच यंत्रणेने शेतकर्यांच्या शेतात जाऊन पंचनाम्याना सुरवात केली.
दरम्यान आमदार किशोर पाटील हे मुबंईत असल्याने त्यांचे पुत्र युवा नेते सुमीत पाटील यांनी भडगांव तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार सागर ढवळे, कृषी मंडळाधिकारी थोरात आदि उपस्थित होते. नुकसान स्थिती सुमीत पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांना सांगीतली. तर अधिकारीना प्रत्येक नुकसान झालेल्या शेतकर्यांचा वस्तुनिष्ठ पंचानामा करण्याच्या सुचना दिल्या.
या संदर्भात आमदार किशोर पाटील म्हणाले की, वादळी पावसामुळे शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास हीरावून नेला आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार आहे.